उल्हासनगरात गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन द्वारे आम्ही लोकसेवक या उपक्रमाची घोषणा
उल्हासनगरात गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन द्वारे आम्ही लोकसेवक या उपक्रमाची घोषणा..
भारतीय स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष संपूर्ण देश साजरं करत असताना तेच निमित्त साधून उल्हासनगरात गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन आम्ही लोकसेवक या उपक्रमाची घोषणा करीत आहे. महापालिकेची मुदत संपल्यानंतरही सार्वत्रिक निवडणुका पुढे पुढे ढकलल्या जात असताना आपले दैनदिन प्रश्न सोडवताना लोकांची गैरसोय होऊ नये व लोकांना सहाय्यभूत ठरेल अशी समांतर यंत्रणा असावी. हा आम्ही लोकसेवक उपक्रमामागचा उद्देश्य आहे.
उल्हासनगर महानगर पालिकेची मुदत ४ एप्रिल २०२२ रोजी संपुष्टात आलीय. महानगरपालिका अधिनियमांतील तरतूदीनुसार, मुदत संपण्यापूर्वी नव्या निर्वाचित महासभेचं गठन व्हायला हवं होतं. मात्र, राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग विविध कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलत आहे. कायद्यानुसार, मागील महासभेची मुदत संपल्यानंतर ६ महिन्यांच्या आत निवडणुका व्हायला हव्यात, पण परिसरातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व इतर नगरपालिका, महानगरपालिकांतील अनुभव पाहता निवडणूक ६ महिन्यांच्या मुदतीतच होईल, याची शाश्वती नाही. याचा फटका सर्वसामान्य जनतेला पडतो आहे.
आपल्या दैनंदिन तक्रारी कोणाकडे कराव्यात असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही लोकसेवक ही संकल्पना आणत आहोत. सुयोग्य लोकसेवकांचा शोध व निवडीचं काम गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन करेल..
संपूर्ण शहरात भागाभागात मनपा प्रभागनिहाय लोकसेवक कार्यरत राहतील. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यावरील दिवाबत्ती याबाबतच्या तक्रारींचा लोकसेवक प्राधान्याने पाठपुरावा करतील. त्याशिवाय, बागबगिच्यांची देखभाल व स्वच्छता, मनपा व खाजगी शाळा, दवाखाने, लसीकरण, करभरणा, रस्तेदुरुस्ती, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे, सार्वजनिक शौचालये, समाजमंदिरे आदीबाबत लोकसेवक लक्ष ठेवून राहतील व महापालिकेशी पत्रव्यवहार करतील. लोकसेवकांचं प्रशिक्षण कायद्याने वागा लोकचळवळ करेल. गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन लोकसेवकांना प्रशासकीय कामात पाठबळ देईल. स्वातंत्र्यदिनापासून अर्थात, १५ ऑगस्ट, २०२२ पासून उल्हासनगर शहरात आम्ही लोकसेवक उपक्रम कार्यरत होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद