पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार       
सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून प्रसारित होणारी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविण्याच्या निर्णयाला अखेर गुरुवारी प्रसारभारतीने स्थगिती दिली.
 

पुणे : आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना स्वातंत्र्याच्या 5-6 वर्षानंतर म्हणजेच 1953 रोजी झाली. गेल्या 40 वर्षापासून या केंद्रावरुन नियमित बातमीपत्र प्रसारित होत होत्या. आकाशवाणीची बातमी म्हणजे विश्वास, आकाशवाणीची बातमी म्हणजे खात्री, आकाशवाणीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी असं चित्र आजही आहे. पुढील आदेशापर्यंत सध्याचीच व्यवस्था कायम राहील, असे प्रसारभारतीच्या आदेशात म्हटले आहे. प्रादेशिक वृत्त विभागाकडून प्रसारित होणारी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविण्याच्या निर्णयाला होणारा विरोध पाहता त्या पार्श्वभूमीवर प्रसारभारतीने तूर्तास तरी स्थगितीचा निर्णय घेतला आहे.

प्रसारभारतीतर्फे गुरुवारी दुपारी याबाबतचे आदेश काढण्यात आले. या आदेशात आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारे बातमीपत्र तसेच साडेआठचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, पुणे विविध भारतीवरून सकाळी आठ वाजता, सकाळी 10.58 मिनिटे, 11.58 मिनिटे आणि सायंकाळी सहा वाजता प्रसारित होणारा पुणे वृत्तांत ही सर्व बातमीपत्रे पुण्यातच तयार केली जातील आणि पुण्यातूनच प्रसारित होतील. पुढील आदेशापर्यंत हीच व्यवस्था कायम राहील. तसेच पुणे वृत्तविभागातील सध्याचे नियमित, कंत्राटी आणि हंगामी कर्मचारीदेखील पुढील आदेशापर्यंत प्रचलित व्यवस्थेनुसार कार्यरत राहतील, असे म्हंटले आहे. प्रसारभारतीच्या वृत्त विभागाच्या महासंचालकांच्या अनुमतीने हे आदेश काढण्यात येत असल्याचे प्रसारभारतीच्या वृत्त विभागाचे सहाय्यक संचालक पी. पवन यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

याविषयी पुणे आकाशवाणी केंद्राचे संचालक इंद्रजित बागल म्हणाले, पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. वृत्त विभाग नवी दिल्ली यांच्याकडून याबाबतचे पत्र मिळाले आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर व्यक्त झाल्यानंतर सरकारला निर्णय स्थगित करून एक पाऊल मागे यावे लागले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गुरुवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी संपर्क साधत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली.

संबंधितांची मते जाणून घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली. तर दुसरीकडे खासदार प्रकाश जावडेकर यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी आकाशवाणीचा पुणे वृत्तविभाग व येथील बातमीपत्र कायम ठेवण्यासाठी अनुराग ठाकूर यांच्याशी व प्रसार भारतीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता.

पुणे आकाशवाणी केंद्राचा वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिल्याबद्दल अनुराग ठाकूर यांचे आभार. पुणेकरांना स्थगिती नको तर निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. केवळ सक्षम माहिती अधिकारी नाही, असे कारण सांगून हे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. मात्र, हे कारण पुन्हा मिळू नये, यासाठी केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकार्‍याची येथे नेमणूक करावी.
– मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार