वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात! सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा

वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात! सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा
मागेल त्याला शेततळे व ड्रीप देण्यासाठी आलेले सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा - मुंडेंचे विभागाला निर्देश

एक रुपयात पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
बोगस बियाण्यांच्या रॅकेटवर धडक कारवाया करण्याचे निर्देश

मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच वाढदिवसाचे गिफ्ट!

कृषी विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणार
( मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर)

 मुंबई (दि. 15) - राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले.

कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप ( ठिबक सिंचन) , शेड नेट अशी योजना आहे. मात्र त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांवर असून विभागामार्फत दहा-दहा हजार शेतकऱ्यांची लॉटरी काढली जाते. लॉटरी काढायची असेल तर मग त्याला मागेल त्याला शेततळे, असे कसे म्हणता येईल, असे लक्षात आणून देत धनंजय मुंडे यांनी विभागाकडे शेततळ्यांचे व ड्रीपचे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे असे निर्देश विभागाला दिले आहेत.

सध्या राज्यभरात व विशेष करून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अद्याप कमी आहे शेतकऱ्यांवर बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे ही संकट येऊ शकते त्यामुळे राज्य सरकारच्या महत्वकांक्षी एक रुपयात पिक विमा या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन तातडीने आपला पिक विमा भरणे गरजेचे आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले असून पिक विमा भरताना कोणत्याही ग्राहक सेवा केंद्राच्या चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास त्यावरही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

राज्यात मागील काही दिवसात बोगस बियाण्यांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली होती राज्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होत असेल अशा रॅकेटवर धडक कारवाया करून कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याकडेही विभागाचे सर्वाधिक लक्ष असेल असेही धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत करण्यापासून ते त्यांच्या पिकाला भाव मिळवण्यापर्यंत सर्व जबाबदारी ही कृषी विभागाची असून आपण अत्यंत प्रामाणिकपणे या विभागात चांगले काम करून दाखवू व कृषी विभागालाही प्रतिष्ठा मिळवून दाखवू असेही मत त्यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 

विभागात असलेल्या सर्व रिक्त पदांचाही अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. 

आजच्या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव श्रीमती सरिता देशमुख-बांदेकर, उपसचिव संतोष कराड, फलोत्पादनचे संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक विकास पाटील, मृद संधारण व पाणलोट विकासाचे संचालक रवी भोसले, आत्माचे संचालक दशरथ मंगाळे, कृषी प्रक्रिया व नियोजनाचे संचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते. 

कृषी विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


*कृषी विभागाच्या रूपाने वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले*

माझे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे शेतकरी होते त्यांनी ऊस तोडणीचेही काम केलेले आहे त्यांना शेतीची खूप आवड होती आज ऐन वाढदिवसाच्या दिवशी मला कृषी खाते मिळाले याचा मला मनस्वी आनंद असून याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे आभार व्यक्त करतो असेही धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार