महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रपताका’ त्रैमासिकाचे थाटात प्रकाशन
महिला दिन विशेष अंकातून मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्वाचा वेध**
(प्रतिनिधी गणेश तळेकर )
मुंबई :महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने निर्मित व प्रकाशित करण्यात आलेल्या चित्रपताका या पहिल्या त्रैमासिकाचे प्रकाशन बुधवार,१ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. महामंडळाच्या संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन पार पडले. हा पहिला अंक आंतरराष्ट्रीय महिला दिन’ या विशेष विषयावर आधारित असून, यात मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्व आणि त्यांच्या सर्जनशील सहभागाचा प्रभावी आढावा घेण्यात आला आहे.
*सर्जनशील संवादाचे नवे व्यासपीठ*
सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाचा आरसा आहे. या माध्यमातील विचारप्रवाह, अनुभव आणि स्मृती यांवर रचनात्मक संवाद घडावा, या उद्देशाने महामंडळाने ‘ *चित्रपताका* ’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, नव्या पिढीचे प्रयोग, या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांसह मान्यवरांचे चिंतन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या त्रैमासिकातून केला जाणार आहे.
*अंकातील विशेष आकर्षणे:*
स्त्रीप्रतिमांचा प्रवास : मराठी चित्रपटातील स्त्री-पात्रांच्या बदलत्या प्रवासावर आधारित अभ्यासपूर्ण लेख.
महिला दिग्दर्शकांचे योगदान: दिग्दर्शनासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात महिलांनी उमटवलेला आपला ठसा आणि त्यांच्या कलात्मक दृष्टीचा वेध.
विशेष मुलाखती व आठवणी:
प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांची विशेष मुलाखत आणि अभिनेत्री अलका कुबल, यांनी चित्रनगरीबद्दल जागवलेल्या आठवणी.
जागतिक संदर्भ: बर्लिन चित्रपट महोत्सवाचा प्रवास आणि 'मंथन' उपक्रमाचा विशेष आढावा.
*संपादकीय चमू:*
या त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक व प्रकाशकाची जबाबदारी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, यांनी पार पाडली आहे. तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू-रावराणे आणि विशेष कार्यकारी अधिकारी सुचित्रा देशपांडे यांनी संपादकीय सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
सिनेरसिकांसाठी आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ‘चित्रपताका’चा हा पहिला अंक माहितीचा मोठा खजिना ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद