*मुंबई मुव्ही स्टुडिओच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचा मानस - नितीन केणी*
*मुंबई मुव्ही स्टुडिओच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचा मानस - नितीन केणी*
वितरण व मार्केटिंग हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे; चित्रपट तयार झाल्यावर त्याच्या मार्केटिंग व वितरणाकडे वळण्यापेक्षा आधी सहा महिने त्याचा विचार व्हायला हवा. यशस्वी चित्रपटांचा विचार केला तर त्यांच्या मार्केटिंग व वितरण स्ट्रॅटेजीमुळे ते शक्य होऊ शकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,’ तिकीट खिडकीवर प्रेक्षकांना खेचून आणणारा सिनेमा चांगला असतो. यात वितरणासोबत प्रमोशन-मार्केटिंग महत्त्वाचे आहे. याचे गणित पुरेपुर ओळखणाऱ्या निर्माते नितीन केणी यांनी चित्रपट क्षेत्रातील आपला तगडा अनुभव गाठीशी घेऊन ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची निर्मिती केली. या स्टुडिओ मार्फत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बॉक्स ऑफ़ीसवर कमाल केली. यात नितीन केणी यांच्या अनुभवाचा खूप मोलाचा वाटा आहे. या यशाबद्दल, आपल्या अनुभवाबद्दल आणि वितरण क्षेत्राकड़े गांभीर्याने पहाण्याची गरज व्यक्त करतानाच चित्रपट क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींविषयी त्यांनी आपली मत मांडली आहेत.
नितीन जी सांगतात, ‘चित्रपट निर्मितीसोबत डिस्ट्रिब्युशन, सिंडिकेशन आणि ॲक्विझिशन या संकल्पनाही महत्त्वाच्या असतात. केवळ चित्रपट वितरण करून भागत नाही, यासोबत चित्रपटनिर्मितीचा विचार करताना क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिक दृष्टिकोन दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. ओव्हरसीज, म्युझिक सेल, ओटीटी किंवा टीव्हीवर कधी पब्लिश करायची हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. माझ्या सुरुवातीच्या काळात मी हे सर्व स्वतः केलं आहे आणि त्यामधून मला खूप मोठा अनुभव मिळाला.” 'शेर शिवराज' चित्रपटाने कमाईचा विक्रम केल्याचे चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळाले ते याच अनुभवातून. टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला ९७% रेटींग मिळालं आहे. 'शेर शिवराज' च्या कमाईचा हा आकडा मराठी चित्रपटांसाठी खूप मोठा आहे. परदेशांमध्ये 'शेर शिवराज' चित्रपटाला मिळालेलं हे यश खूप मोठं आणि मराठी सिनेसृष्टीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
मनोरंजनाचे कितीही पर्याय उपलब्ध झाले तरी “Cinema is the mother of this industry.” असं म्हणणारे नितीनजी सांगतात, ‘हे माझं पॅशन आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला मनोरंजनसृष्टी खुणावत होती. विद्यार्थी दशेत असताना नाटकं लिहायचो, ते दिग्दर्शनही करायचो. याच दरम्यान मी मराठी व हिंदी दोन्ही भाषेतील प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं आहे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावरही माझी आवड जपली ती ‘एनएफडीसी’च्या माध्यमातून’! एनएफडीसीमधल्या अनुभवांबद्दल बोलताना नितीनजी सांगतात, ‘इथे मला अतिशय सुंदर, ग्रेट असा अनुभव मिळाला’. यामध्ये जरी फिल्म मेकींगचा अनुभव मिळाला नसला तरी मी फिल्म फेस्टिवलसाठी फिल्म्स घेऊन जायचो.” सन १९८४-८५ मध्ये ‘घरे बैरे’ हा चित्रपट ‘कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’साठी मी नेलेला पहिला चित्रपट. त्यांनतर सलाम बॉम्बे, पिरवी असे अनेक चित्रपट मी कान्स व इतर आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नेले. माझ्यासाठी ही खूप चांगली शिकण्याची संधी होती. यानंतर मात्र मी आपलं संपूर्ण लक्ष मनोरंजनाच्या दुनियेवर केंद्रित केलं. सुरवातीला झी टीव्हीचे ‘फाउंडर आणि प्रेसिडंट’ म्हणून काम पाहिलं परंतु माझं मन टीव्हीकडे नाही, तर चित्रपटांकडे ओढ घेत होतं. यानंतर मला प्रकर्षाने चित्रपट निर्मितीचे क्षेत्र खुणावू लागले. या दरम्यान मला ‘गदर’ची कथा मला मिळाली आणि मला ती आवडली. ही कथा घेऊन मी गोएंका यांच्याकडे घेऊन गेलो आणि गदरची निर्मिती करायचं निश्चित केलं. या चित्रपटाने कमाल केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला.
झी स्टुडिओने सुरुवातीच्या काळात काही प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली. मराठी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणं हा झी स्टुडिओ निर्मितीचा मुख्य हेतू होता. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांची दुरावस्था होत असतानाच त्यांना संजीवनी देण्याचं काम झी स्टुडिओने केलं. यानंतर २०११ मध्ये ‘काकस्पर्श’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर मात्र मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले. २०११ ते २०१६ हा काळ मराठी चित्रपसृष्टीसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरला. या काळामध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती झी स्टुडिओकडून करण्यात आली. टाईमपास, टाईमपास २, लय भारी, दुनियादारी, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, प्रकाश बाबा आमटे, सैराट अशा एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपटांची रांगच लागली. सैराट तर बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवणारा मराठीमधील पहिला ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरला.
हा सुवर्णकाळ अनुभवल्यानंतर व त्यासाठीचं माझं योगदान दिल्यानंतर नवं काही करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात केली. अर्थात या कामात मला थोडाफार स्ट्रगल करावा लागलाच, माझा हा प्रवास आजतागायत सुरु असून भविष्यात वितरणाचे जाळे अधिक मजबूत करत ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’च्या माध्यमातून दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचा माझा मानस आहे. आपल्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ बद्दल बोलताना नितीनजीं सांगतात, “या माध्यमातून केवळ चित्रपट निर्मिती होईल आणि चित्रपट थिएटरवरच प्रदर्शित केले जातील.” सध्या मुंबई मुव्ही स्टुडिओच्या माध्यमातून एक मल्याळम चित्रपट रिलीज झाला आहे, तर दुसरा रिलीज व्हायच्या मार्गावर आहे. याशिवाय १ पंजाबी चित्रपट ‘हॉटेल प्यासा’ व रवींद्रनाथ टागोरांच्या ‘फर्स्ट लव्ह’ या कथेवर आधारित एका बंगाली चित्रपटाची निर्मितीही या स्टुडिओच्या माध्यमातून होणार आहे. ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’च्या माध्यमातून चित्रपट प्रदर्शित करू इच्छिणाऱ्या इच्छुक लेखक, दिग्दर्शकानीं त्यांची कथा, स्क्रिप्ट किंवा Narration स्टुडिओमध्ये पाठवावे. जर कथा/स्क्रिप्ट चांगली असेल, तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल. या स्टुडिओच्या माध्यमातून दरवर्षी ५ ते ६ मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे.
https://mumbaimoviestudios.com/ या वेबसाइटवर ‘मुंबई मुव्ही स्टुडिओची संपूर्ण माहिती पहाता येईल.
( प्रतिनिधी गणेश तळेकर
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद