'साथ सोबत'चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

'साथ सोबत'चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच उत्कंठा वाढवणाऱ्या 'साथ सोबत' या आगामी मराठी चित्रपटचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना नेमकं काय पहायला मिळणार याचे संकेत देणारा आणि खऱ्या अर्थानं 'साथ सोबत'ची ओळख करून देणारा असा हा ट्रेलर आहे. १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'साथ सोबत'च्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम केलं आहे. नेटकऱ्यांकडून ट्रेलरचं कौतुक होत असून, अत्यंत कमी वेळेत या ट्रेलरला खूप लाईक्स मिळत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी 'साथ सोबत'चा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टिमचा उत्साह वाढवला आहे.
महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये 'साथ सोबत'चा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला कलाकार-तंत्रज्ञांसह काही मान्यवरांनीही हजेरी लावली. प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच लेखनही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवलेले दिग्दर्शक रमेश मोरे यांनी केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. 'आपलं म्हणून केलं ना, की न साध्य होणाऱ्या गोष्टीसुद्धा सहज साध्य होतात', हा जगण्याचा यशस्वी मंत्र सांगणाऱ्या संवादापासून 'साथ सोबत'चा ट्रेलर सुरू होतो. त्यानंतर कोकणातील चिरेबंदी-मातीच्या घरांमध्ये रुग्णांची सेवा करणारा संग्राम समेळ आणि मोहन जोशी हे दोन पिढ्यांचं प्रतिनिधीत्व करणारे डॅाक्टर्स दिसतात. कोकणातील भल्या मोठ्या घरात विचार करणारे मोहन जोशी आणि काट्याकुट्यांच्या अवघड वाटा तुडवत औषधोपचारांसाठी पोहोचणारे रुग्ण ट्रेलरमध्ये आहेत. 'कधी तरी केव्हा तरी वाटा हरवल्या...' हे शब्दांच्या माध्यमातून जीवनाचं दर्शन घडवणारं गाणं आहे. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राजदत्तही आहेत. कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्याची 'साथ सोबत' करत या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना काहीतरी महत्त्वपूर्ण संदेश देणार असल्याची खात्री ट्रेलर पाहिल्यावर होते. 'साथ सोबत'च्या ट्रेलरबाबत दिग्दर्शक रमेश मोरे म्हणाले की, या चित्रपटात प्रेक्षकांना एक अनोखी आणि खऱ्या अर्थानं लाल मातीतील कथा पहायला मिळणार आहे. चित्रपटाची ओळख करून देणारा ट्रेलर प्रेक्षकांना भावत आहे यातच 'साथ सोबत'च्या टिमचं यश दडलेलं आहे. चित्रपट पडद्यावर पाहतानाही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशाही मोरे यांनी व्यक्त केली.

मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये वावरणारा संग्राम समेळ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्याची जोडी नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत जमली आहे. याशिवाय राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनीही अभिनय केला आहे. डिओपी हर्षल कंटक यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, अभिषेक म्हसकर यांनी संकलन केलं आहे. यशश्री मोरे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीत दिग्दर्शनासोबतच पार्श्वसंगीतही महेश नाईक यांनी दिलं आहे. वेशभूषा यशश्री मोरे यांनी यांनी केली असून, रंगभूषा संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी केली आहे. नृत्य दिग्दर्शनासोबत केशभूषा करण्याची जबाबदारी मीनल घाग यांनी सांभाळली असून, कला दिग्दर्शन प्रकाश कांबळे यांनी केलं आहे. 'साथ सोबत' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते कौशिक मारू आणि यशश्री मोरे आहेत.
प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत