एक रहस्यमय रेल्वे स्टेशन

 - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन
(ही कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजन साठी आहे)
 

हे गाव आहे तालुक्याच पण चांगलं सधन आणि मोठ्या लोकवस्तीचं. रेल्वे झाल्याने गावक-यांना आता गावातून शहराकडे जायला यायला चांगली सोय झाली असे वाटत होते. पण कसचं काय. इथे रेल्वे थांबत नसे. रेल्वेस्टेशन झालं तर आजूबाजूच्या गावांची पण सोय होणार होती. नाहीतर त्यांना ३० किमी वर पुढे जावं लागे किंवा मागे ४० किमी वर.

 येथे कोणतीच ट्रेन थांबत नाही ही या गावक-यांची तक्रार नेहमी संबधित जिल्हाधिकारी, तसेच  रेल्वेमंत्री यापर्यंत जायची. गावकरी लोकांनी एकदा एक गोष्ट मनावर घेतली की ते मागे हटत नाहीत. भांडायला पण गावकरी एक नंबर. स्थानिक आमदार पण मेटाकुटीला आला होता. गावक-यांना गावातून रेल्वे जाते पण थांबत नाही हे खटकायचं.
शेवटी एकदाचं पाठपुराव्याला यश येऊन इथे रेल्वे थांबू लागली. एकच जल्लोष झाला.
रेल्वे थांबू लागल्याने गावाला झळाळी आली. रेल्वे स्टेशनच्या आसपास दुकाने झाली. प्लॅटफॉर्मवर हातगाडीवाले , फेरीवाले यांचा वावर वाढला. व्यापारी शहरात जायला इथे येऊ लागले. आजूबाजूच्या गावातले लोकही इथे येऊ लागले. त्यांच्यासाठी मग टांगे धावू लागले. आर्थिक व्यवहार सुद्धा वाढले होते  

स्टेशन मास्तर रमाकांत तडवी हे आलेल्या ट्रेन्सवर काय काय सामान चढवलं उतरवलं याचा हिशेब टॅली करत बसले होते.
इतक्यात सिग्नलम नरेन कुंडू समोर येऊन थांबला. त्याची फक्त चुळबूळ चालू होती. स्टेशनमास्तर कामात असल्याने विषय कसा काढावा हे त्याला समजत नव्हते.

रमाकांत तडवी यांना कुंडू येऊन उभा राहील्याची जाणीव तर होती. पण तो काहीतरी बोलेल मग आपण बोलू म्हणून ते काम संपले असतानाही चार्ट मधे डोकं खुपसून बसले होते. पण कुंडू काही बोलत नाही म्हणून ते शेवटी त्याच्यावर खेकसले.

कुंडूंने शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाला
" उद्यापासून मला संध्याकाळच्या वेळी सिग्नल्स चेक करायला पाठवू नका"
रमाकांत चिडले. ते डाफरले.
पण कुंडू ठाम होता. त्याला खरे तर ट्रान्स्फरच हवी होती. पण ती तडफाफडकी मिळणार नाही हे त्याला ठाऊक होतं. म्हणून ट्रान्स्फर होईपर्यंत संध्याकाळी काम नको म्हणत होता.

तेवढ्यात दुसरा सिग्नलमन देखील आला. त्या दोघांच्यातच भांडण सुरू झालं.
दुसरा आलेला कुंडू ला म्हणत होता, संध्याकाळी तुला नको मग काय मी कायमचा करू का नाईट शिफ्ट ?

आता हे भांडण का चाललेय हे रमाकांत यांना समजेना. हळू हळू त्यांना उलगडा होऊ लागला.
दोघांना कसली तरी भीती वाटत होती.

रमाकांत विचारात पडले. मग त्यांनी दोघांची समजूत काढायचे ठरवले.
रेल्वे हे सरकारचे खाते. त्यात कुणाला भीती वाटते म्हणून ड्युटी नको असे सांगता येत नाही. अशी शिफारस पाठवणे त्यांनाही शक्य नव्हते. पण दोघे अजिबात ऐकायला तयार नव्हते.

दोघांना रात्री काही तरी रहस्यमय प्रकार दिसले होते. जे त्यांना दिसले होते ते विलक्षण होते आणि भयानक सुद्धा.
बरं अजून काही जणांनी हा प्रकार पाहिला होता.

संध्याकाळ झाली कि रेल्वे स्टेशनवर एक तरूणी फिरत असे. एव्हाना स्टेशन मास्तर घरी गेलेले असायचे. त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हते.
या दोन सिग्नलमन मुळे पहिल्यांदा ते ऐकत होते.
त्यामुळेच गेल्या काही दिवसातल्या घटनांचा अर्थ आता त्यांना लागत होता.
गेल्या काही महीन्यांपासून इथे संध्या़काळनंतर ट्रेन्स न थांबण्याचे प्रकार होत होते. सुरूवातीला त्यांनी इग्नोर केलं.
पण दोन तीनदा झाल्यावर त्यांनी पुढे रिपोर्ट्स पाठवले. आता मात्र सर्रास ट्रेन्स थांबत नव्हत्या.

 हे स्टेशन सुरू होऊन. पाचच वर्षे झाली होती.
रमाकांत तडवी नुकतेच आले होते.
त्यांना इतक्यात इथे काय काय चालू आहे याची कल्पना नव्हती.
पण नंतर समजत गेले.

आधीचा स्टेशनमास्तर इथून भिऊन बदली करून घेऊन पळाला होता. त्याचे वरपर्यंत संबंध असल्याने ताबडतोब त्याला बदली करून मिळाली आणि रमाकांत तडवी यांना इथे पोस्टींगचं भाग्य लाभलं.

रमाकांत तडवी फक्त सरकारी कहाणी लिहीत होते.
जी सर्व नियमांमधे बसेल. यात हाताखालच्या 
कर्मचा-यांचीही काळजी ते घेत होते. त्यांच्या तोंडी असे कोणतेही वक्तव्य ते येत नव्हते ज्यामुळे पुढे त्यांना खाकी डोक्याच्या चौकशी अधिका-याला तोंड द्यावे लागेल. एकदा काळ्याचं पांढरं झालं की मग ते नाकारणे सुद्धा मुश्कील होते.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय हे रमाकांत यांना चांगलेच कळत होते. अर्थात ही मराठी म्हण त्यांना माहीत असणे शक्यच नव्हते. त्यांनी आजच्या कामगिरीवर आधारीत गाववाल्यांचे म्हणणे मांडले. पुरावा म्हणून मीटींगचा कागद जोडला. शिवाय रेल्वे कर्मचा-यांशी बोलून आणि चौकशी करून पुढचा रिपोर्ट लवकरच पाठवू असे आश्वासन द्यायला ते विसरले नाहीत.

हळूहळू त्यांना आपल्याला कसे बकरा बनवले जात आहे याचा उलगडा होत चालला होता.
रमाकांत चा उच्चार तडवी होतो. त्यांचे नाव रमाकांत होते. पण लोक त्यांना रमाकांत बंधू म्हणत. ते अत्यंत सज्जन गृहस्थ होते. कुणाचंही वाईट होऊ नये अशा बेताने त्यांनी आजवर अधिकाराच्या जागेवर काम केले होते. वेळप्रसंगी प्रशासनाच्या अडचणी ओळखून अगदी दुर्गम ठिकाणी कामही केले होते. अनेक मार्गावर जेव्हां प्रॉब्लेम्स होते तेव्हांही त्यांनी तिथे काम केले होते.

इथेही प्रशासनाने त्यांना प्रॉब्लेम सांगितला असता तर ते नाही म्हणालेच नसते. पण त्यांची फसवणूक झाली आहे असे त्यांना वाटत होते.
त्यांच्या आधीचा जो स्टेशनमास्तर होता तो पळून गेला होता. त्याने मी राजीनामा देईन पण इथे काम करणार नाही असे सांगितलेले होते. त्याच्यासोबतच्या स्टाफनेही आमची पोस्टींग होत नाही तोवर आम्ही सुटीवर जाऊ पण कामावर येणार नाही असे सांगितले होते. भारतात कुठेही टाका आम्ही जाऊ पण इथे नको असे निवेदन सर्वांनी दिले होते.

रमाकांत तडवी अशा बातम्या काढण्याइतके चलाख नव्हते. निवांत पणा मिळतोय म्हणून ते ही आले होते. जवळच एक आश्रम होता. एक शिवालय होते आणि गावात एक नवस करण्यासाठी प्रसिद्ध एक मशीद पण होती. रमाकांत तडवी तर खूप खूष झाले होते. त्यांचा जरा देवाधर्माकडे ओढा होता. पण आपल्या पोस्टींगमागचा हेतू चांगला नाही हे त्यांना समजले होते. अर्थात रेल्वे प्रशासनाला कुणाला तरी पाठवावेच लागणार होते. रमाकांत तडवीना वाटले फक्त एक शब्दाने सांगायचे होते की ही पोस्टींग प्रॉब्लेम असल्याने आहे. त्यांनी हसत हसत स्विकारले असते.

आधीचा स्टेशन मास्तर देखील असाच आलेला.
पण त्याला लवकरच आधीच्या स्टेशनमास्तरबद्दल समजले.

मोहन सांगळे नाव होते त्यांचे !!

काही वर्षांपूर्वी मोहन  इथे आले.
रात्रीच्या येणा-या जाणा-या ट्रेन्स आणि त्यातून उतरणारे चढणारे प्रवासी, सामान यांची व्यवस्था नीट आहे का हे बघण्यासाठी ते संध्याकाळी देखील थांबत होते. स्टेशन तसं नवीन होतं. व्यवस्था लागेपर्यंत तरी रात्रीचं थांबणं गरजेचं होतं. नंतर मग असिस्टंट वर सोपवणे शक्य होते. कित्येकदा रात्रीच्या वेळी स्टेशनमास्तर स्टेशनवर नसतातच. बुकींग क्लर्क किंवा टीसी यापैकी जो सीनीअर असेल तो अडीअडचणीच्या समस्या बघतो.

काही ठिकाणी विशिष्ट वेळेनंतर तिकीट विंडो सुद्धा बंद होते.
अशा ठिकाणी गार्ड / सिग्नलमन असे लोक असतात. गरज लागलीच तर स्टेशनमास्तरांना उठवून आणायचे असा रिवाज असतो.

मोहन च्या कानी संध्याकाळ नंतर रेल्वे स्टेशनवर प्रॉब्लेम आहे अशा तक्रारी आल्या होत्या. पण त्या खूपच मोघम होत्या. नीट काय ते कुणी सांगत नव्हते.

एक दिवस रात्रीच्या वेळी ते केबीन बाहेर बसले असताना त्यांना विचित्र वाटू लागले.
एक चहाची टपरी होती. ती बंद झाली होती. सिग्नलला असलेले दोघेही प्लॅटफॉर्मपासून दूर उभे होते. ते एकटेच होते.
अंधाराने रेल्वे स्टेशनचा परीसर गिळला होता. कमी वॅटचे दिवे अंधाराशी उगीचच क्षीण लढाई करत होते.

इमारतीजवळचं झाड त्यामागून येणा-या अंधारलाटांमुळे सावली होऊन इमारतीवर झुलत होतं.
त्यांच्या ऑफीसच्या खिडकीतून छायाप्रकाशाचा हा खेळ चालू होता.

मोहन याना असे वाटले की कुणीतरी इथे वावरतेय.
हा भास त्यांना खूप वेळ होत होता. त्यांना दरदरून घाम फुटला. आजूबाजूला कुणीच नाही म्हणून ते ऑफीस मधून बाहेर प्लॅटफॉर्मवर आले.
दूर दोघे बिड्या ओढत उभे होते. त्यांना आवाज देणार इतक्यात एक विचित्र प्रकार त्यांना पहायला मिळाला.
पलिकडच्या बाजूने एक मुलगी ट्रेनच्या मागे पळत जाताना त्यांना दिसली. खेडेगावात असं होऊ शकतं. ट्रेनच्या मागे एखादी मुलगी पळत पण जाऊ शकते. पण तिचा धावण्याचा वेग त्यांना जरा जास्तच वाटला. तरीही त्यांनी दुर्लक्ष केले.
मोहन याना बघून दोघे जण जवळ आले. त्यांची अवस्था ठीक वाटत नव्हती. मग दोघांनी मिळून याच इमारतीत मागच्या बाजूला असलेल्या त्यांच्या क्वार्टरमधे त्यांना नेलं. पाणी पाजलं.

सकाळी मोहन यानी आपल्या सर्व कर्मचा-यांना बोलवलं. आपला अनुभव त्यांच्याशी शेअर केला. पण सगळेच म्हणू लागले की हा त्यांचा भास असेल. मग मोहन यानी पण हा विचार झटकून टाकला. पण उत्सुकता होतीच.

संध्याकाळ झाली.
आज मोहन प्लॅटफॉर्मवरच होते. कालचा अनुभव किती खरा हे त्यांनाच ठाऊक होते.
पलिकडच्या बाजूला एक मुलगी त्यांना दिसली. ती रूळ ओलांडून स्टेशन वर आली. ती जशी काही आपल्याच नादात असल्याप्रमाणे नाचत होती.
इतक्यात येणारी एक ट्रेन येताना दिसली. त्याबरोबर ती नाचायची थांबली.

या ट्रेनला इथे थांबा नव्हता. ती धाडधाड करत स्टेशनमधून जाऊ लागली. तिच्यामागे ही मुलगी पळत सुटली.
काल मोहनयांनी  दुर्लक्ष केले होते. पण आज त्यांना विचित्र वाटत होते. कारण,
ती मुलगी ट्रेनच्या मागून तिच्या पुढे धावत होती !!

मोहन आपल्या ऑफीस मधे जाऊन बसले. तेव्हां त्यांना पुन्हा कालचा भास झाला.
त्या खोलीत त्यांच्या व्यतिरिक्त काही तरी होते. कधी श्वास सोडल्यासारखा भास होत होता. कधी कुणीतरी चालतंय असा भास होत होता.
ते पुन्हा घामाने निथळत बाहेर आले.
आज कुणाला काही न सांगता ते क्वार्टर मधे गेले. झोपायचा प्रयत्न करत त्यांनी रात्र काढली.

दुस-या दिवशी सकाळी न राहवून पुन्हा कर्मचा-यांना रात्री काही दिसले का अशी विचारणा केली. कुणालाच काही दिसले नव्हते.
मोहन यानी सकाळी कामावर आलेल्या कर्मचा-यांना पण रात्री थोडा वेळ चक्कर मारून जा अशी विनंती केली.

संध्याकाळ झाली. रेल्वे स्टेशनवर पुन्हा ती तरूणी दिसू लागली.
हे भयंकर विचित्र होतं.
एखादे दिवशी होऊ शकतं. दुस-या दिवशी पण होईल. पण सलग तिस-या दिवशी ?
ती नाचत होती.

सर्वांना ती दिसत होती. यात मोहन यांना काय खटकतंय हे समजत नव्हतं. कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झालेला असू शकतो. पण पुढचा भाग मोहननी त्यांना सांगितलेला नव्हता. आज प्रात्यक्षिकच दाखवूयात म्हणून त्यांनि सर्वांना एकाच वेळी हजर राहण्याची विनंती केली होती.

येथून जाणारी विनाथांबा गाडी स्टेशनमधून बाहेर पडली. तशी ती नाचायचे थांबून ट्रेनच्या मागे पळत सुटली.
आता मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले. कारण तिने ट्रेनच्या पुढे जाऊन रूळातून धावायला सुरूवात केली होती. थोड्याच वेळात ती ट्रेनला मागे टाकून दिसेनाशी झाली.

मोहन यानी कर्मचा-यांशी आता चर्चा नको म्हणून त्यांना घरी जायची सूचना केली. सकाळी पुन्हा एकदा रात्रीच्या कर्मचा-यांनाही थोडा वेळ येऊन जायची विनंती केली.

सगळं नीट आवरून ऑफीस आवरायला ते आत गेले.
मोहन यांना तिथे काय दिसले हे कधीच नंतर समजले नाही. कारण ते खूप मोठ्याने ओरडून बेशुद्ध पडले होते.
अजून कुणी स्टेशन सोडलं नसल्याने ज्यांची ड्युटी नव्हती त्यांनी मोहन ला जवळच्या डॉक्टरकडे नेले. त्यांनी घाईघाईत इंजेक्शन दिलं. काही गोळ्या दिल्या. आणि उद्या बघू असे सांगितले.

मोहन त्यानंतर खूप आजारी झाले.
त्यांची तब्येत नंतर कधीच सुधारली नाही. त्यातच ते गेले.
स्टाफलाही हा धक्का बसला होता..

रमाकांत यांनी मोहनची कहाणी शोधून काढली. मोहन नंतर जो स्टेशनमास्तर आलेला तो दाक्षिणात्य होता. त्याने हेडक्वार्टर मधे कुणा दाक्षिणात्य अधिका-याला भेटून ताबडतोब बदली घेतली.

मोहन चा स्टाफही बदलून गेला होता. आताचा सगळाच नवीन होता.
त्यामुळेच रमाकांत तडवी यांना लगेचच हकीकत समजली नव्हती.

मोहनचं निधन झालं. त्या आधी त्यांना काही तरी दिसत होतं असं ते म्हणायचे.
ते आपल्या स्टाफला इथून निघून जा म्हणायचे.
ते पण घरी जाणार होते. जमल्यास बदली किंवा नोकरी सोडून.
पण त्या आधीच ते गेले.
त्यांना नेमके काय झाले होते हे समजलेच नाही.
त्यांचा स्टाफही गेला.

मोहन गेल्यानंतर मग ही हकीकत वा-यासारखी सगळीकडे पसरली. आता लोक उघडपणे बोलू लागले.
रात्री अपरात्री उतरलेल्या प्रवाशांनी या मुलीला तिथे पाहिले होते. ती स्टेशनवर नाचायची. मधेच हातवारे करायची.
काहींनी तिला झाडावर बसलेली पाहिली होती.

तर ब-याच जणांनी दिवसा विहीरीतून आवाज ऐकले होते.

मोहन गेले त्या दिवशी इतर ठिकाणी असलेल्या स्टेशनवरही ही चर्चा झाली.
तिथून जाणा-या ट्रेन्सचे ड्रायव्हर्स या स्टेशनवर त्यांना आलेले अनुभव सांगत होते.

राघवन नावाचे स्टेशन मास्तर आले होते.
त्यांनी न थांबणा-या ट्रेन्सवर कारवाईचा इशारा दिलेला होता.
ते जवळ पास असलेल्या  एका स्टेशनवर देखील जाऊन आले होते.
त्यांनी ट्रेन ड्रायव्हर्सच्या मुलाखती घेतल्या होत्या.
याची हकीकत रमाकांत तडवी यांना आता जुन्या फायलीत मिळाली होती.
एक एक्स्प्रेस रुळावरून संध्याकाळी ७ वाजता निघाली होती.
अंधारून आलेलं होतं.

मधे नदीवरचा पूल होता. साधारण ताशी ६० च्या आसपास ट्रेनचा स्पीड होता. पूल गेल्यानंतर तो वाढला. रेल्वे स्टेशन येईपर्यंत वेग ताशी ८० च्या पुढे सहजच होता. स्टेशनमधे ट्रेन घुसली आणि ड्रायव्हर आणि गार्डला काहीतरी विचित्र प्रकार दिसला.

सुरेंद्र सैनी  यांची ड्युटी संपलेली होती आणि ते  घरी परतत होते. त्यांनी आपल्या मित्राच्या जवळ म्हणजे ड्रायव्हर इस्माईल खान च्या केबीनमधेच बसून जायचं ठरवलं होतं.
पूल पार होताना दोघेही गप्प बसले होते. पुढे स्टेशन दिसत होतं

गाडी स्टेशनात घुसली आणि आपल्या बाजूने कुणीतरी धावतंय असा इस्माईल यांना भास झाला. त्यांनी बाजूला पाहीलं तर एक पांढ-या वस्त्रातली एक मुलगी त्यांच्या सोबत धावत होती. इस्माईल यांना झटकन आपल्या गाडीचा स्पीड किती आहे याची आठवण आली. त्यांचा भूताखेतांवर चांगलाच विश्वास होता. त्यांनी सुरेंद्र यांना खूण केली. सुरेंद्र उठून बघायला लागले.

त्यांचीही बोबडीच वळायची बाकी होती. कारण आता त्या मुलीने वेग वाढवला आणि ती ट्रेनच्या पुढ्यात रूळात आली होती.
जोरात ब्रेक लावायची इस्माईल यांना इच्छा झाली.

पण काही वेळा गोष्टी जुळून येतात. सुरेंद्र हे त्यांना काय वाटलं आणि इंजिनमधे बसायला आले होते.
त्यांनी इस्माईल यांच्या हातावर चापट्या मारल्या आणि खूण केली.

त्या खूणेचा अर्थ होता कि ब्रेक नाही.
अचानक कुणी मधे आले तर त्या एकाला वाचवायचे की गाडीतले असंख्य जीव वाचवायचे हा निर्णय घ्यावा लागतो. सुरेंद्र यांनी त्याचे स्मरण करून दिले. पण ती तरूणी ट्रेनला मागे टाकून दिसेनाशी झाली.
इस्माईल घामाने निथळत होते.

दुस-या दिवशी त्यांनी हा अनुभव सांगितला. तेव्हां असाच अनुभव आलेले प्रदीप सेन पुढे आले.
त्या दिवशी या अनुभवाचीच चर्चा होती.

येताना इस्माईल यांच्या गाडीला या स्टेशन चा थांबा होता. वेळ सायंकाळची. जाणारे प्रवासी ह्या गाडीत चढणार होते.
पण इस्माईल यांचा जीव वरखाली होत होता.

स्टेशन येता येता त्यांच्या गाडीचा वेग ९०च्या आसपास पोहोचला होता.
गार्डचा लाल झेंडा पाहूनही गाडी थांबली नाही.

स्टेशन संपता संपता झाडाजवळून तीच मुलगी ट्रेनच्या जवळून धावायला लागली. या वेळी ती इस्माईल यांना हात करत होती. हसत होती. खुणावत होती.
आणि ती त्यांच्याही पेक्षा वेगात पुढे जाऊन रूळाच्या मधोमध कमरेवर हात देऊन उभी राहिली.
आज तर सुरेंद्र पण नव्हते सावरायला.

इस्माईल यांनी डोळ्यावर हाताचं मनगट धरलं आणि डोकं मागच्या बाजूला वळवलं.

गाडी त्याच वेगात पुढे निघून गेली.
गाडीखाली काही आल्याची जाणीव झाली नाही.
जंक्शन स्टेशन वर पोहोचतानाही स्टेशनमधे कुणी गाडीखाली आल्याचा मेसेज आला नव्हता.

इस्माईल यांनी रेल्वे कार्यालयात फक्त जवळच्या
 सहका-यांजवळ या प्रकाराची वाच्यता केली.
असा रितीने स्टेशन ची किर्ती हळू हळू पसरायला लागली.

राघवन साहेबांना इस्माईल यांची कहाणी समजली.
त्यानंतर ते पाच दिवस रेल्वे स्टेशनवर थांबत होते.

सहाव्या दिवशी त्यांनी पोबारा केला. आपल्या स्टाफलाही जायला मदत केली.

आणि रमाकांत तडवी तिथे आले.
रमाकांत नी बरंचसं उत्खनन केलं होतं.
या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावायच्या तयारीने ते आले होते.

रात्री रमाकांत शाल घेऊन रेल्वे स्टेशनवर रात्र काढायला आले.
आताशा रात्रीचे प्रवासी बंद झाले होते.
शुकशुकाटच होता,

त्यांना जास्तच थंडी वाजत होती.
जणू काही इथे शून्य तापमान असावं असा गारवा सुटला होता.
रमाकांत यांना आपल्या भोवती थंड हवेचं काही तरी असल्याचे भास होत होते. तिकीट खिडकी बंद झाली होती. पण क्लार्कला त्यांनी थांबायला सांगितले होते. त्ते ज्या बाकड्यावर बसले होते त्याच्या मागून कुणीतरी चालतंय असं त्यांना वाटलं. त्यांनी मागे वळून पाहीलं.
कुणीच नव्हतं.

ट्रेन यायला अवकाश होता,
ते ऑफीस मधे आले. बल्ब लावला. पण जणू काही त्याची प्रकाश फेकायची शक्तीच नाहीशी झाली होती.
एखाद्या पहिलवानाला दहा किलो वजनही उचलता येऊ नये अशी त्या बल्बची अवस्था झाली होती.
रमाकांत यांनी  स्टेशनकडे तोंड करून असलेली खिडकी सताड उघडी ठेवली होती.
मानेच्या मागे दोन्ही हात ठेवत ते खुर्चीत बसले होते.

खिडकीतून त्यांना शुभ्र वस्त्रातली एक बाई दिसली.
रमाकांत सावध झाले.
त्यांच्या ऑफीस मधे ते एकटे नाहीत याची त्यांना जाणीव होऊ लागली.
आणि मग ऐकलेले असंख्य किस्से फेर धरून नाचू लागले.
इतकेच की आता ते प्रत्यक्ष या प्रसंगाचा भाग होते.

ऐकणे वेगळे, त्यावर शेरेबाजी करणे वेगळे आणि आता साक्षीदार होने वेगळे.
रमाकांत सावध होते. त्यांना जिवाची रिस्क घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.
ते झटकन बाहेर आले.

स्टेशनच्या कोप-यात तीच उभी होती.
स्टेशनवर फक्त दोघे उभे होते.
एक ते स्वतःआणि दुसरी ती ....
रमाकांत यांनी तिकीट खिडकी कडे पाहीले.
क्लार्क बहुतेक आत झोपलेला असावा.

प्रसंग बाका होता,
समोर काय आहे याची रमाकांत यांना निश्चित कल्पना आली होती.
आता काय घडतेय याची वाट पाहणे इतकेच हातात होते.

त्यांनी मागे पाहीले.
गरज पडली तर स्टेशनमधून तीराच्या वेगाने वाहेर पडत गावाच्या दिशेने धावत सुटलं तर ?
पण मधला सताड मोकळा पट्टा कितीतरी मोठा होता.
आणि निरमनुष्यही !

रमाकांत देवाचा धावा करू लागले.
आणि इतक्यात ट्रेनचा आवाज आला.

ती एकदम ताठ उभी राहिली. तिचं रमाकांत कडे दुर्लक्ष झालं.
एव्हढ्याच संधीचा फायदा घेऊन रमाकांत तिकीटघरात गेले. क्लार्कला डुलकी लागलेली.
त्याला जागे केले आणि दोघे फलाटावर लपून बघू लागले.

ट्रेन जवळ येऊ लागली तसा तिचा वेग वाढला होता.
आणि ती फलाटावरून खाली उतरून ट्रेनच्या बाजूने धावू लागली.
आधी प्रवाशांनी तिला पाहिली.

आता हे सर्वांनाच ठाऊक झाले होते.
प्रवासी घाबरून बसलेले. ब-याच खिडक्या बंद होत्या. पोराबाळांना आतल्या बाजूला बसवले गेले. काहींनी डोळे बंद करून घेतले होते.
तर काहींना उत्सुकता आणि भीती दोन्ही होती.
ते बघत होते.

बघता बघता ती इंजिनजवळ गेली आणि आत चढायचा प्रयत्न करू लागली.
ड्रायव्हरने वेग अजूनच वाढवला.

मग तिने ट्रेन सोडून दिली.
ती बाजूला दिसेनाशी झाली.

रमाकांत थरथर कापत होते.
आता चटकन निघावं म्हणून ते झाडाजवळून निघणार तर..

ती झाडावर बसून दोघांकडे बघत होती........................ क्रमशः.( उर्वरित भाग पुढील भागात )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार