ऑगस्टपर्यंत पिण्याचे मुबलक पाणी; अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 38 टक्के साठा

ऑगस्टपर्यंत पिण्याचे मुबलक पाणी; 
अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 38 टक्के साठा
 अहमदनगर; पावसाळा लांबल्यामुळे जनतेचे लक्ष आता साहजिकच जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याकडे वळाले आहे. आजमितीस धरणांत 18 हजार 783 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या 37.42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा धरणात 9 हजार 350 व भंडारदरा धरणात 5 हजार 697 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तरीही, या दोन मोठ्या धरणांवरील पाणीयोजनांना ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरणार आहे.
जिल्ह्यात मध्यम व मोठे असे एकूण आठ धरणे आहेत. त्यांची एकूण पाणीसाठवण क्षमता 50 हजार 188 दलघफू इतकी आहे. गेल्या

तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने जिल्हाभरातील लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. धरणांच्या लाभक्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्यामुळे भूजलपातळी देखील कमालीची वाढलेली आहे. त्यामुळे गावागावांतील विहिरींची पाणीपातळी देखील वाढलेली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तनाची म्हणावी अशी गरज लागली नाही. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाळा सुरु झाला तरीही धरणांत पाणीसाठा 25 टक्क्यांपेक्षा अधिक शिल्लक राहात आला आहे.

गेल्या वर्षी 18 जून रोजी मुळा धरणात 8 हजार 470 दलघफू इतका पाणीसाठा होता. सध्या या धरणात 9 हजार 350 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणांच्या पाण्यावर अहमदनगरसह 20 पाणीयोजना अवलंबून आहेत. या पाणीयोजनांसाठी भंडारदरा धरणात गेल्या वर्षी 2 हजार 564 दलघफू तर निळवंडे धरणात 3 हजार 878 इतका पाणीसाठा होता. आजमितीस मात्र भंडारदरामध्ये 5 हजार 697 तर निळवंडे धरणात 2 हजार 185 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या वर्षी 16 हजार 578 दलघफू पाणीसाठा होता. यंदा जिल्हाभरातील धरणांत 18 हजार 773 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 195 दलघफू इतका पाणीसाठा अधिक आहे. जून महिन्यातील तीन आठवडे संपले तरीही पावसाच्या सरी कोसळल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील चिंताग्रस्त झाली आहे. पावसाअभावी खरीप पेरणी खोळंबली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली आहे. पावसाने आणखी ताण दिल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे.

'भंडारदरा'वरील पाणीयोजनांना भीती नाही

सध्या भंडारदरा व निळवंडे या दोन धरणांत साडेसात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीसाठी आवर्तन सुटले असून, त्याला अडीच-तीन टीएमसी पाणी लागणार आहे. त्यानंतर जवळपास चार टीएमसी पाणी शिल्लक राहाणार आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांवरील पाणी योजनांना सप्टेंबरपर्यंत पाणी पुरणार असल्याचे अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी सांगितले.

ऑगस्टअखेरपर्यंत पाणी पुरणार

मुळा धरणावर 20 पाणीयोजना आहेत. यामध्ये अहमदनगर महापालिकेसह एमआयडीसी व राहुरी, नेवासा तालुक्यांतील पाणीयोजनांचा समावेश आहे. शासनाने पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी पुरणार असल्याचे मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

धरणांतील पाणीसाठा मुळा : 9350
भंडारदरा : 5697
निळवंडे : 2185
आढळा : 553
मांडओहळ : 63.02
घाटगाव : 62
सीना : 916
खैरी : 142.11
घोड : 1096

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार