नोकरी अन् कर्जाचे आमिष, ३५७ कोटींचे रॅकेट उद्ध्वस्त; सीबीआयची देशभरात कारवाई
मुंबई : तरुणांना नोकरीचे आमिष दाखवणे, सुलभ कर्जाचे गाजर दाखवणे, भरघोस परतावा योजना सादर करत फसवणे, अशा विविध कारणांद्वारे तब्बल ३५७ कोटींचे रॅकेट चालविणाऱ्या भामट्यांचा सीबीआयने पर्दाफाश केला. ऑपरेशन चक्र -२ या अंतर्गत यात गुंतलेल्या कंपन्या व लोकांचा वर्षभर मागोवा घेत ही कारवाई केली आहे.
गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसी सीबीआयने देशभरात ७५ पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली. अनेक संगणक, डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली. सामान्यांना फसविण्यासाठी या सायबर भामट्यांनी सोशल मीडियाद्वारे जाहिराती देत लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले.
१३७ बनावट कंपन्यांद्वारे परदेशात फिरवला पैसा
लोकांना गंडा घालून मिळवलेला हा पैसा फिरवण्यासाठी तब्बल १३७ बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांद्वारे यूपीआय आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून परदेशात पैसा फिरवला. पुढे या पैशांची गुंतवणूक क्रिप्टो करन्सीमध्ये केल्याचेही सीबीआयच्या तपासात आढळले आहे. सुमारे १६ बँक खात्यातून ३५७ कोटींचे व्यवहार झाल्याचे आढळले आहे.
जप्ती कशाची?
कारवाईदरम्यान एकूण ३२ मोबाईल, ४८ लॅपटॉप, दोन सर्व्हर, ३३ सीमकार्ड, शेकडो पेनड्राईव्ह, आदी साहित्य जप्त केले आहे. आरोपींनी संवाद व संपर्कासाठी एकूण १५ ई-मेल आयडी तयार केले होते.
५ राज्यांत नऊ कॉल सेंटर
आरोपींनी पाच राज्यांत ९ कॉल सेंटरदेखील उघडले होते. सामान्य लोकांना फोन करून त्यांना योजना सांगितल्या जात होत्या. ही कॉल सेंटर्सही छाप्यात उद्ध्वस्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद