विदर्भातल्या प्रवाशांची दिवाळी गोड होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; ५ नोव्हेंबर रोजी विशेष गाडी
विदर्भातल्या प्रवाशांची दिवाळी गोड होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; ५ नोव्हेंबर रोजी विशेष गाडी
नागपूर : दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - नागपूर दरम्यान येत्या ५ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नोकरी तसेच शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्याला असणाऱ्या नागपूर विदर्भातील लोकांची संख्या मोठी आहे. दिवाळीत यातील बहुतांशजण घरी परतत असतात.
त्यामुळे दरवर्षीच दिवाळीच्या आधी पुणे - नागपूर व दिवाळीनंतर नागपूर - पुणे या मार्गावर रेल्वे, बस, विमान यात जागा मिळणे कठीण होते. या काळात विमानाचे दर तर प्रचंड वाढलेले असतातच, पण खासगी बसेसचे तिकीटही ५ हजार रुपयांच्या पुढे जाते. यंदा एसटीनेही या मार्गावर स्लिपर सेवा सुरू केली आहे. मात्र, ही बस वातानुकूलित नाही. नागपूर- पुणे प्रवासाचे एका व्यक्तीला १५९५ रुपये पडतात. नागपूर - पुणे- नागपूर दरम्यान दररोज एसटीच्या तीन स्लिपर बस धावतात. मात्र, आजघडीस या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे.
रेल्वेचे आरक्षण तर दोन महिने आधीच संपले. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याच मालेत ५ तारखेला पुणे - नागपूर गाडी सोडण्यात येईल. या गाडीचा तपशील असा०२१०७ पुणे नागपूर विशेष रेल्वे - ही गाडी पुण्यावरून ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ तारखेला ६.५० वाजता नागपूरला पोहोचेल. उरुळी, दौन्ड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव व वर्धा येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
या गाडीला १३ स्लिपर, सेकंड एसीचा १, थर्ड एसीचे २, जनरल ६ व एसएलआर २ असे कोच राहतील.मार्गातील स्थानकांवर या गाडीच्या आगमन - प्रस्थान वेळा अशा- उरळी (१६.२३, १६.२५), दौंड (१७.३०, १७.३२), अहमदनगर (१९.०२, १९.०५), बेलापूर (२०.०३, २०.०५), कोपरगाव (२०.५०, २०.५२), मनमाड (२२.०५, २२.१०), भुसावळ (००.३५, ००.४०), मलकापूर (१.१८, १.२०), शेगाव (२.००, २.०२), अकोला (२.४०, २.४२), बडनेरा (३.४८, ३.५०), धामणगाव (४.२६, ४.३८), वर्धा ५.१८, ५.२०). प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद