सुप्रिया प्रॉडक्शनची अनोखी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

सुप्रिया प्रॉडक्शनची अनोखी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा
गोपीनाथ सावकार-अनंत काणेंच्या नावाने सांघिक पुरस्कार
      मुंबई - महाराष्ट्रातील महत्वाच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शनच्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे सांघिक पुरस्कार रंगभूमीला ललामभूत ठरलेली उत्तमोत्तम नाटके दिलेले नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार आणि एकाहून एक सरस अशा नाटकांची निर्मिती केलेले ज्येष्ठ नाट्यनिर्माते अनंत काणे यांच्या नावाने दिले जाणार आहेत. तसेच वैयक्तिक पुरस्कारदेखील मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवलेल्या अनेक दिग्गजांच्या नावे दिले जातात, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. श्री शिवाजी स्मारक मंडळ आणि व्हिजन यांच्या सहकार्याने आयोजित केल्या जात असलेल्या या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ ते ७ जानेवारी आणि अंतिम फेरी १२ जानेवारी रोजी नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या जन्मदिनी शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे.

      महाराष्ट्रभरातील रंगकर्मींसाठी ही एक आव्हानात्मक आणि वेगळी स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेला गेली ६ वर्षे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील सुमारे १६ बोलींतील २४९ एकांकिका आजवर या स्पर्धेत सादर झाल्या आहेत. ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही कल्पना प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्पर्धेच्या स्वरुपात अंमलात आणली. २०१६ या पहिल्याच वर्षी या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतरच्या ५ वर्षांत ही स्पर्धक संख्या वाढतीच राहीली. मालवणी, सातारी, कोल्हापूरी, संगमेश्‍वरी, आगरी, खानदेशी, अहिराणी अशा अनेक बोलींतील एकांकिका या स्पर्धेत सहभागी झाल्या. वेगवेगळ्या बोलींतील सहभागी एकांकिका, नामवंत परीक्षक, आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि अजित भगत, चेतन दातार, रघुवीर तळाशीलकर, विनय आपटे, सतीश तारे, आशालता वाबगांवकर, कुलदीप पवार, संगीतकार राजू पोतदार, रंगमहर्षी कृष्णा बोरकर, प्रकाशयोजनाकार उमेश मुळीक अशा दिग्गज रंगकर्मींच्या नावाने ज्येष्ठ रंगकर्मींनीच पुरस्कृत केलेली रोख रकमांची वैयक्तिक पारितोषिके ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये राहीलेली आहेत.

     स्वत: नाट्यनिर्मिती करणार्‍या व्यावसायिक नाट्यसंस्थेने अशा प्रकारची वेगळी स्पर्धा आयोजित करणे आणि त्यामध्ये सातत्य ठेवणे, हेसुध्दा या स्पर्धेचे वेगळेपण ठरले आहे. 

       आपल्या अभिनय व दिग्दर्शनाने गोपीनाथ सावकार यांनी मराठी रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवला. ययाती आणि देवयानी, भावबंधन, सुवर्णतुला अशी दर्जेदार नाटके सावकार यांनी रंगभूमीवर आणली. तर अनंत काणे यांनी सूर राहू दे, गुलाम, वर्षाव, गुंतता हृदय हे, आनंदी गोपाळ, सुरुंग अशी एकाहून एक दर्जेदार नाटके रंगभूमीला दिली. एकच लेखक (शं. ना. नवरे), एकच दिग्दर्शक (नंदकुमार रावते), एकच नेपथ्यकार (बाबा पार्सेकर) आणि एकच प्रकाशयोजनाकार (अरविंद मयेकर) अशी एक वेगळी मोनोपॉली काणे यांनी मराठी रंगभूमीवर जपली.

      नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या नावाने दिला जाणारा सांघिक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केला आहे. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९९३०४६६९२४या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण वेगवेगळ्या बोलींतील एकांकिका घेऊन महाराष्ट्रातून अधिकाधिक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी गणेश तळेकर
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार