कविता जीवन मूल्यांची वाहिनी असते. - प्रा .दामोदर मोरे
कविता जीवन मूल्यांची वाहिनी असते.
- प्रा .दामोदर मोरे
(प्रतिनिधी आशा रणखांबे)
नेरळ : कविता ही जीवन मूल्यांची वाहिनी असते. मूल्यें समाजाची पातळी उंचावण्याचे काम करीत असतात. कवितेला करुणा या मूल्याचे अधिष्ठान असले पाहिजे. संघपाल वाठोरे यांच्या 'अन् देव निरुत्तर झाला' या कविता संग्रहाला जशी ग्रामीण, सामाजिक पर्यावरणाची पार्श्वभूमी आहे तशीच माथेरान सारख्या निसर्ग रम्य ठिकाणाचीही पार्श्वभूमी आहे. तरल संवेदनशीलता, संवाद शैली आणि ग्रामीण बोलीचा जिवंत झरा यामुळे या कविता मनाची पकड घेतात." असे प्रतिपादन जेष्ठ मराठी हिंदी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांनी केले. संघपाल वाठोरे यांच्या 'अन् देव निरुत्तर झाला' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय भाषण करतांना ते हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले नेरळ येथे बोलत होते .
पीपल्स पब्लिकेशनकडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'अन् देव निरुत्तर झाला' या कवितासंग्रहाचे प्रकाशन जोशी बेडेकर महाविद्यालयाचे माजी मराठी विभागप्रमुख, मराठी व हिंदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले. जेष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे यांनी यावेळी लिंबू महात्म्य ही कवी संघपाल वाठोरे यांची कविता आपल्या सुरेल आवाजात सादर केली. तर संघपाल वाठोरे, स्वाती वाठोरे , सचिन भोईर यांनी ही 'अन् देव निरुत्तर झाला' या संग्रहातील कवितांचे वाचन केले. प्रमुख मान्यवर पाहुण्यांचे स्वागत संविधान उद्देशिका आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी सावळाराम जाधव, लेखक गिरीश कंटे, कवी संघपाल वाठोरे , प्रकाशक प्रा. हरेंद्र सोष्टे , कवी नवनाथ रणखांबे , कवी अनंत धनसरे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद