महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे---- राज ठाकरे
महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे---- राज ठाकरे
कल्याणच्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्यांच्या मदतीसाठी आलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केली. अखिलेश शुक्लाने सरकारी नोकरीचा धाक दाखवत मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य अरेरावी केली. त्यानंतर बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप व काठ्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर मराठी भाषिकांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणावरुन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्ता राहत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
कल्याणच्या अजमेरा सोसायटीमध्ये शेजाऱ्यांसोबत धूप लावण्याच्या वादावरुन महाराष्ट्र शासनाच्या एमटीडी विभागात काम करणाऱ्या अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांसोबत जोरदार भांडण केले होते. त्यामुळे बाजूलाच राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने अखिलेश गुप्ता याने बाहेरून गुंड बोलवून मराठी कुटुंबियांना जबर मारहाण केली. यामुळे काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुप्ता विरोधात तक्रार नोंदवून घेतली. या घटनेनंतर संतत्प मराठी भाषिकांनी या घटनेविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मिडिया पोस्टमधून मारहाण झालेल्या मराठी व्यक्तीची बायको, आई लाडकी बहीण नाही का? असा सवाल केला आहे.
"कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी गुप्ता नावाचा माणूस होता. महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्ता, गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही!," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
"कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो!," असंही राज ठाकरे म्हणाले.
"अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच! 'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ. हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे ! मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी," असं राज ठाकरे म्हणाले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद