दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णयतीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन
दिव्यांगांना आता १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय
तीन दशकानंतर निधीत १५ पट वाढ; स्वयंरोजगारासाठी 'दिव्यांग सहाय्यक' पोर्टलवर नोंदणीचे आवाहन
मुंबई:
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री (टूलकिट) खरेदी करण्याकरिता आता १,००० रुपयांऐवजी थेट १५,००० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर या रकमेत १५ पटीने वाढ करण्यात आल्याने दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, "विकसित महाराष्ट्र २०४७" या आराखड्याचा भाग म्हणून दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे शासनाचे मुख्य ध्येय आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप
थेट लाभ हस्तांतरण (DBT): मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
पात्रता: अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
विविध व्यवसायांसाठी संधी: शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रिकल कामे, सुतारकाम आणि वाहन दुरुस्ती यांसारख्या व्यवसायांसाठी हे टूलकिट खरेदी करता येईल.
महिलांना प्राधान्य: या योजनेत प्रशिक्षित दिव्यांग महिलांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
पारदर्शक निवड प्रक्रिया: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करेल. निधी मिळाल्यावर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केला आहे की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे.
बोगस लाभार्थ्यांना चाप
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे २९.६३ लाख दिव्यांग व्यक्ती आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी UDID (दिव्यांग वैश्विक ओळखपत्र) अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे केवळ गरजू आणि पात्र दिव्यांगांनाच लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थ्यांना चाप बसेल.
अर्ज कोठे करावा?
पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:
👉 https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in
"१५ हजार रुपयांच्या अर्थसहाय्यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल. त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल."
— तुकाराम मुंढे, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद