भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*
*भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात*
*मुंबई/ (प्रतिनिधी, अशोक शिरसाट)*
आर.एस.एस.चे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स' आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.
' *मोदी हटाव, देश बचाव'च्या घोषणांनी मुंबई दणाणली*
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव, देश बचाव' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अॅड. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका केली. भारत आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करत असून, हे भविष्यासाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
*दिग्गजांची उपस्थिती*
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्षा रूपवते, दिशा पिंकी शेख, युवा नेते सुजात आंबेडकर, निलेश विश्वकर्मा, स्नेहल सोहनी, सागर गवई, चेतन अहिरे, सचिन गायकवाड, अविनाश भोसीकर यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष सोनू पवार, प्राक्त मनोज पवार आणि जिल्हा नेते सारंग थोरात उपस्थित होते.
या महामोर्चात मुंबईसह उपनगरांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले होते.
मुंबई प्रतिनिधी अशोक शिरसाट साप्ताहिक बातमी जनहित
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद