एक दिलदार राजा अन् माणसातील देवमाणूस:* डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब!
*एक दिलदार राजा अन् माणसातील देवमाणूस:*
डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब!
— भीमराव निकम - चिलगावकर
(कार्यकारी संपादक, बातमी जनहित वृत्तपत्र | प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम | संपादक, वृत्तदर्शन मीडिया सर्व्हीसेस)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) तथा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव मा. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड साहेब आज वयाची ६३ वर्षे पूर्ण करून ६४ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) या पदापासून ते प्रशासनातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. या शुभप्रसंगी त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि सामाजिक प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!
*३५ वर्षांचे ऋणानुबंध अन् आधारस्तंभ*
गायकवाड साहेब आणि माझी मैत्री ही तब्बल ३० ते ३५ वर्षांपूर्वीची—म्हणजेच ते सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून कार्यरत असल्यापासूनची आहे. केवळ एक सनदी अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाचे जिवाभावाचे, संकट काळातील खंबीर मित्र आणि माझे आधारस्तंभ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. माझ्या कौटुंबिक प्रवासात, विशेषतः दोन्ही मुलींच्या लग्नसमारंभात साहेबांनी दिलेला आधार मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.
*मैत्रीचा अनमोल अन् आठवणीत राहणारा किस्सा*
आमच्या ३५ वर्षांच्या मैत्रीतील एक अत्यंत भावूक आणि हृदयाला स्पर्शून जाणारा प्रसंग आज प्रकर्षाने आठवतो. सन २००८ मध्ये माझी मोठी मुलगी प्रियांका (माई) हिचा विवाह ठरला होता. लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन मी साहेबांचे आशीर्वाद आणि मदत मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो.
त्यांच्या घरातील मुख्य हॉलमध्ये भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत भव्य अन् आकर्षक मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या मूर्तींकडे पाहताना मी सहज साहेबांना विचारले, "साहेब, मुलीच्या लग्नसमारंभात या दोन्ही मूर्ती मी घेऊन जाऊ का?"
माझा प्रश्न ऐकून साहेबांनी चेहऱ्यावर स्मितहास्य केले आणि म्हणाले, "फक्त मूर्तीच का भीमराव?"
त्या क्षणी साहेबांनी एका क्षणाचाही विलंब न लावता, कसलाही संकोच न बाळगता किंवा मनात अढी न ठेवता, मुलीच्या विवाहासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कन्यादान, योगदान आणि धम्मदानासह घरातील त्या अत्यंत पवित्र अशा भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्ही मूर्ती अत्यंत उदार अंतःकरणाने माझ्या स्वाधीन केल्या.
त्यांच्या या दिलदारपणाने माझे डोळे पाणावले. आपल्या घरातील श्रद्धास्थाने इतक्या सहजतेने आणि आपुलकीने दुसऱ्याला देणे, यासाठी केवळ मोठे पद असून चालत नाही, तर तसे विशाल आणि दानशूर हृदय असावे लागते.
शुभेच्छा अन् दीर्घायुष्याची प्रार्थना
असा हा दिलदार मनाचा राजा, संकटात धावून येणारा माणसातील देवमाणूस डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा!
तसेच 'बातमी जनहित' वृत्तपत्र परिवार, 'बहुजन संग्राम' सामाजिक संघटना आणि 'वृत्तदर्शन मीडिया सर्व्हिसेस' परिवार यांच्या वतीने आदरणीय साहेबांना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच भगवंताच्या व बोधिसत्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद