अनाथांच्या मदतीसाठी आर्ट फेअरचे आयोजन केले
राष्ट्रातील अनाथांच्या मदतीसाठी
महाराष्ट्र आर्ट फेअर
मुम्बई दि. १३ ते १९ सप्टेंबर, २०२२ हया दरम्यान नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये
महाराष्ट्रातील व्यावसायिक व उद्योजकांच्या कलाकृतींचा समावेश
महाराष्ट्रातील व्यावसायिक व उद्योजकांनी छंद म्हणून जोपासलेल्या दर्जेदार कलाकृतींना कलाक्षेत्रात वाव मिळावा तसेच त्यांच्या कलाकृतींतून सामाजिक कार्यास हातभार लाभावा या हेतूने दीपकला फाऊंडेशनतर्फे “महाराष्ट्र आर्ट फेअर” चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये दि. १३ ते १९ सप्टेंबर, २०२२ हया दरम्यान संपन्न होणार आहे.हया प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कला व चित्रपट तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या हस्ते होणार आहे.
सदर प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील वकील, इंजिनीअर, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, बॅंकर्स तसेच इतर असे अनेक व्यावसायिक व उद्योजकांनी छंद म्हणून जोपासलेल्या फोटोग्राफी, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलाकृतींचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या कलेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. सदर प्रदर्शनात विकल्या गेलेल्या चित्रातील १० % रक्कम अनाथांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.
दीपकला फाऊंडेशन गेली अनेक वर्ष सामाजिक व कलाक्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक कार्याबरोबरच मुंबई व महाराष्ट्रातील चित्रकारांना एकत्रित आणून त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना वाव आणि व्यवसाय मिळवून देणे, हा हया संस्थेचा मुळ उद्देश आहे. हयावर्षी अनाथांच्या मदतीसाठी त्यांनी हया आर्ट फेअरचे आयोजन केले आहे.
विविध चित्रकारांनी सादर केलेल्या बहूआयामी कलाकृतींना जास्तीत जास्त मागणी होऊन त्यांना कला संग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा आणि त्याद्वारे सहभागी कलाकारांना व्यवसाय उपलब्ध व्हावा व त्यांचाही हातभार हया सामाजिक कार्यास लाभावा हा आयोजकांचा हया प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे. हया हेतूने “महाराष्ट्र आर्ट फेअर” चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आर्ट फेअरमध्ये अॅड. प्रदीप चव्हाण, अॅड. स्वाती बुरडे, अॅड. जयदीप घोष, अॅड. कामिनी मिश्रा, नितेश वाघोदे (इंजिनियर), प्रदीप मेस्त्री (चार्टर्ड अकाऊंटंट), सतीश रत्नपारखी (केमिकल इंजिनियर), लक्ष्मी वेंकटेश (केमिकल इंजिनियर), चंद्रकांत डेरे (व्यंगचित्रकार), स्वप्नाली बेर्डे,, तापस मैती हया व्यावसायिक व उद्योजकांच्या कलाकृती व शिल्पकृतींचा समावेश आहे. हा आर्ट फेअर दि. १३ ते १९ सप्टेंबर, २०२२ कालावधीत रोज ११ ते ७ हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद